Sunday, July 6, 2014

जुनी कथा नवा बोध



मानवी वर्तनाचे काही पॅटर्न कालातीत आहेत. काही उत्साही  उंटावरून शेळ्या हाकणारे लोक फुकटचे सल्ले द्यायला पुढे सरसावतात आणि सल्ला स्विकारला गेला नाही तर  हटवादी, मूर्ख असे शिक्के मारून मोकळे होतात. तर काही लोक बेदिक्कत भीड्भाड न बाळगता चुकीचे सल्ले देऊन बुद्धीभेद, दिशाभूल करायचा प्रयत्न करतात.

पंचतंत्र हे माझं अत्यंत आवडतं पुस्तक. त्यातली ही गोष्ट पावसात अडकलेल्या माकडाची आणि त्याला उपदेश करणार्‍या चिमणीची... त्या कथेतला "उपदिश्य कपिं मूर्खं चटका संकटं गता" हा बोध मला पटत नाही.

माकड आणि चिमणीच्या गोष्टीत चिमणीने सल्ला देताना मागचा पुढचा फारसा विचार केलेला दिसत नाही. माकड स्वत:चे घर बांधुन राहात नाही   की त्याच्या स्वत:च्या घरी तो परिस्थितीने जाऊ शकत नाही. घर बांधण्यास ते माकड समर्थ का नाही, या प्रश्नांचे उत्तर शोधायचा प्रयत्न पण ती चिमणी करत नाही.

त्या चिमणीने पावसात भिजलेल्या माकडाप्रती कोणतीही संवेदना न दाखवता "..शीतेन कम्पसे मूढ कुतो न कुरुषे गृहं" असा प्रश्न करून एकप्रकारे  त्याच्या शेपटीवरच पाय दिला आहे (किंवा चोच मारली आहे).

मी त्या चिमणीच्या जागी असतो तर आस्थेने माकडाची विचारपूस केली असती, त्याची समस्या त्याच्या भूमिकेतून समजावून घ्यायचा प्रयत्न केला असता आणि मग सल्ला देणे योग्य की अयोग्य हे ठरवले असते.

प्रत्यक्षात इथे rapport नसताना सल्ला द्यायला जाणे हा मूर्खपणा चिमणीने केला आहे ( आणि तो तिच्या जिवावर बेतला आहे). तेव्हा माकडापेक्षा इथे चिमणी जास्त मूर्ख ठरते.

तात्पर्य - रॅपो नसेल तर सल्ले देण्याच्या फंदात पडु नये.

No comments:

Post a Comment